कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामध्ये काही खासदार जाणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. यामध्ये आता कोल्हापूरमधील दोन्ही खासदारही चर्चेचा विषय ठरले आहेत. ते मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तशा घडामोडीही घडत असल्याचे समोर येत आहे. यावर येत्या दोन दिवसांत निर्णय होऊन ‘तो’ जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज निपाणी येथील एका विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील एका खासदाराच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरच ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. त्या बैठकीला खासदारही उपस्थित होते, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. आज ‘त्या’ खासदारांच्या काही कार्यकर्त्यांच्या व्हॉटस अप ग्रुपवर ही चर्चा चांगलीच रंगली होती.

आज निपाणी येथील बैठकीनंतर उद्या खासदारांच्या मतदारसंघातील मुख्य गावात पुन्हा त्यांच्या गटाच्या जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये ‘हा’ निर्णय पक्का करूनच उद्या जाहीर करूया, अशी चर्चा आज करण्यात आली आहे. कोणालाही कोणतीही खबर लागू नये, या पार्श्वभूमीवर ही बैठक निपाणी येथे घेण्यात आल्याचे समजते. जिल्ह्यातील दुसऱ्या खासदारांनीही अश्याच पद्धतीचे नियोजन केले असल्याचे त्यांच्याच गोटातून पुढे येत आहे. त्यामुळे उद्या रविवार किंवा २ ते ३ दिवसांत पुन्हा शिवसेनेत मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सद्यस्थितीत मात्र जिल्ह्यातील दोन्ही खासदार मुख्यमंत्री शिंदे गटाकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

गेल्या आठवड्यातील शिवसेनेच्या सर्वच घडामोडींपासून हे खासदार लांबच राहिले आहेत. शिवाय काल (शुक्रवारी) कोल्हापुरात झालेल्या महत्वाच्या मेळाव्यालाही ते अनुपस्थित राहिले होते. यावरून त्यांच्या भूमिका संदिग्ध वाटत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. अशातच आज राजेश क्षीरसागर यांनीही या दोघांवर टीका करण्याचे टाळून सूचक वक्तव्य केले आहे. अशातच आज झालेल्या तातडीच्या बैठकांमधूनही वेगळा वास येत आहे, अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत ‘हा’ निर्णय झाल्यास नवल वाटायला नको..!