मुंबई : राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या बुधवारी म्हणजेच २० जुलै रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दहा ते बारा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दोघांचेच मंत्रिमंडळ असल्यावरुन विरोधकांनी टीकेचा सूर लावला होता. पुढच्या चारच दिवसात शिंदे-फडणवीसांच्या साथीला जवळपास बारा मंत्री येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी शपथविधीचा पहिला टप्पा होईल. यावेळी कमीत कमी मंत्र्यांचा शपथविधी करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या टप्प्यात २० तारखेला भाजपकडून पाच ते सहा जण, तर शिंदे गटातून पाच ते सहा जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याचे संकेत मिळत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि दिग्गज नेते राधाकृष्ण विखे-पाटील पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर शिंदे गटातून पहिल्या टप्प्यात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
मंत्रिमंडळ विस्तार १७ किंवा १९ जुलैला होणार होता, परंतु १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यावेळी सर्वच आमदारांना मुंबईत यावे लागणार आहे. त्यामुळे मतदारसंघातून त्यांना पुन्हा-पुन्हा मुंबईत यावे लागू नये, यासाठी आसपासची तारीख ठरली होती.