गारगोटी (प्रतिनिधी) : येथील श्री मौनी विद्यापीठाचा अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री व आमदार सतेज डी. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली.

‘ही निवड म्हणजे माझे भाग्य समजतो. आसपासच्या परिसरातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची संधी मिळत आहे. याबद्दल संस्थेच्या सर्व सभासदांचा मी मनापासून आभारी आहे. पुढील काळामध्ये सुद्धा विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे प्रतिपादन सतेज पाटील यांनी केले.

मौनी महाराज यांची पुण्यतिथी विद्यापीठाची ‘वर्धापन दिन’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी महाराजांच्या समाधीसमोर अखंड नंदादीपावर प्रज्वलित केलेली ‘ज्ञानज्योत’ मिरवणूक मौनी विद्यापीठामध्ये मोठ्या उत्साहात नेली जाते. मौनी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सतेज पाटील, डॉ. सतेज डी. पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

१९४६ साली प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था कोल्हापूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे यांच्या सहकार्याने देशातील पहिले ग्रामीण विद्यापीठ ‘मौनी विद्यापीठ’ माध्यमातून सुरु झाले. यामध्ये, डॉ. व्ही. टी. पाटील (संस्थापक अध्यक्ष) पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक (शिक्षणतज्ज्ञ) आणि प्रभाकरपंत कोरगावकर, डॉ. चित्रा नाईक, प्राचार्य सी. आर. तावडे, आचार्य सी. जे. भागवत, गुरुवर्य बाबूराव जगताप, शंकरराव देव, व्ही. आर. जाधव या अनेक मान्यवरांनी मौनी विद्यापीठाला वेगळ्या उंचीवर नेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

श्री मौनी विद्यापीठात १३ शैक्षणिक संस्था आणि ८ प्रशिक्षण केंद्रे आहेत. गारगोटी येथे पूर्व प्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंतचे शिक्षण दिले जाते. सुमारे ६५०० विद्यार्थी आणि ४००० हून अधिक प्रशिक्षणार्थी श्री मौनीच्या विविध शाखांमधून शिक्षण घेत आहेत. १९७६ ते १९९३ पर्यंत श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.