कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यातील तीस ते चाळीस गावांना नेटवर्क पुरवणारा पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील बीएसएनएल कंपनीचा टॉवर गेली दहा दिवस बंद आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अतिवृष्टी, महापूर यामुळे आकुर्डे, आंबर्डे पुलासह अनेक ठिकाणी पाणी आल्याने गावांचाही संपर्क तुटला आहे. त्यामुळे धामणी खोऱ्यातील नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे या परिसरातील जास्तीत जास्त ग्राहक संख्या असणाऱ्या बीएसएनएलचा टॉवर बंद व नेटवर्क नसल्याने नागरिकांतून बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता ते सतत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. धामणी खोऱ्यातील जास्तीत जास्त नागरिक बीएसएनएलचे ग्राहक आहेत. सध्या पावसाळयात नागरिक शेतामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे विविध कामांसाठी नेटवर्क नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. महिन्याभराचा मारलेला रिचार्ज वाया जात असून, ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

धामणी खोऱ्यात बीएसएनएल नेटवर्कला सतत अडथळा येत असतो. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा प्रश्न कायमचा मिटवावा. बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर नेटवर्क पूर्ववत करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भागातील नागरिकांनी दिला आहे.