कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील करवीर, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, राधानगरी या तालुक्यातील एकूण २० शहीद वीर जवानांच्या कुटुंबीयांना त्या त्या तालुक्यातील प्रत्येकी २ हेक्टर जमीन शेती प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाटप करण्यात आली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिली आहे.

भारतीय सैन्य दलात किंवा सशस्त्र दलामध्ये कार्यरत जवानास अथवा अधिकाऱ्यास कोणत्याही युध्दात, युध्दजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कार्यवाहीत वीरमरण आल्यास अशा जवानांच्या कायदेशीर वारसास निर्बाध्यरीत्या वाटपासाठी उपलब्ध असलेली जमीन कृषी प्रयोजनासाठी, भोगाधिकार मूल्यरहित, विनालिलाव प्रदान करण्यात येणार येते.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून लष्करी कारवायामध्ये धारातीर्थी पडलेल्या शहीद जवानांची माहिती व त्यांच्या कुटुंबीयांचा तपशील घेण्यात आला आहे. मौजे सडेगुडवळे, ता. चंदगड येथे गट नंबर ६४४ मधील प्रत्येकी २ हेक्टर आर इतक्या क्षेत्राचे शेती योग्य भूखंड करून भूखंडामध्ये १५ व ९ मीटरचे रस्ते या सर्व बाबींचे सीमांकन करून मोजणी नकाशा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लज, शिरोळ, कागल, आजरा, करवीर तालुक्यातील अधिवासी असणाऱ्या शहीद जवानांच्या पात्र कुटुंबीयांना या गट नंबर मधील प्रत्येकी २ हेक्टर आर इतक्या क्षेत्राचे जमिनीचे प्लॉट वाटप करण्यात आले आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.