कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे व आमदार डॉ. विनय कोरे या दोघांना भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद द्यावे, अशी मागणी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत महाडिक व आवाडे यांची छत्रपती राजाराम साखर कारखाना येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राजाराम साखर कारखाना चेअरमन दिलीप पाटील, वडगाव बाजार समिती सभापती सुरेश पाटील, जि.प.चे माजी सदस्य राहुल आवाडे आदी उपस्थित होते.

भाजप व एकनाथ शिंदे शिवसेना गट यांचे नुकतेच राज्यात सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये भाजपला आवाडे व कोरे यांनी पाठिंबा देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे दोन्ही नेते ज्येष्ठ व अनुभवी आहेत. त्यांचा राजकीय लाभ आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबरोबर महापालिका, नगरपालिका व साखर कारखाना निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून त्यांना मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी माजी खासदार आवाडे व माजी आमदार महाडिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.