कळे (प्रतिनिधी) : कळे येथे घरासमोरील मोकळी जागा देवस्थान समितीकडून ये-जा करण्यासाठी भुईभाड्याने घेतलेली वाट बंद केली. या कारणावरून काठ्या आणि लोखंडी सळीने दोन कुटुंबात मारामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील एकूण आठजण जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या कोल्हापूर-बाजारभोगाव रोडवर असणाऱ्या महाराष्ट्र देवस्थान समितीची जागा आहे. या जागेला लागून आकुर्डे येथील बापू राऊ पाटील यांनी दोन मजली घर बांधले आहे. तर  घरासमोरील मोकळी जागा देवस्थान समितीकडून भुईभाड्याने घेतली आहे. पण देवस्थानच्या जागेत कळे येतील सुभाष पांडूरंग मोळे यांनी अतिक्रमण करून दुकान गाळे बांधले आहेत. पाटील कुटुंबीयांना ये-जा करण्यासाठीची वाट पत्रे लावून बंद करत असताना वाट बंद का करता. आपले प्रकरण न्यायालयात आहे. निकाल लागेल तेव्हा बघूया असे म्हणत असताना वाट बंद करण्यासाठी आलेले मोळे आणि पाटील कुटुंबीय यांच्यात मारामारी झाली.

यामध्ये दोन्हीकडील महिलांसह आठजण जखमी झाले असून सुनील पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून कळे पोलिसांच्याकडून दोन्ही कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.