कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये १४ वर्षांखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत ऐश्वर्याच्या कामगिरीचे कौतुक केले.

पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली असली, तरी तिने दाखवलेली जिद्द ही अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे सांगत आ. पाटील यांनी ऐश्वर्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विम्बल्डनसारख्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एवढ्या लहान वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या एकमेव खेळाडू ठरली आहे. येणाऱ्या काळामध्ये ऐश्वर्या टेनिस विश्वात कोल्हापूरचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उंचावेल, असा विश्वास आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. ऐश्वर्या आणि तिच्या पालकांचे अभिनंदन करत आ. पाटील यांनी भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

ऐश्वर्याचे प्रशिक्षक हर्षद देसाई, मानल देसाई, ऐश्वर्याची आई अंजली, वडील दयानंद जाधव उपस्थित होते. आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंड येथे झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या जाधव ही एकमेव कोल्हापूरची खेळाडू होती. ऐश्वर्या ही फ्रान्समध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी गुरुवारी रवाना होणार आहे.