कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोटीतीर्थ तलावाच्या प्रदूषणास कारणीभूत असलेले सर्व स्रोत थांबण्यासाठी महापालिका, प्रदूषण नियंत्रण व आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तलावाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी केली.

‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी तलावाच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या यादवनगर येथील सांडपाणी थांबवण्यासाठी महापालिकेने पावले उचलावीत, जनावरे व कपडे धुण्यासाठी वेगळ्या कुंडाची व्यवस्था करावी, भाविकांसाठी निर्माल्य कुंड बांधावे, अशा सूचना केल्या. महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रम्बरे यांनी तलावाच्या सुशोभीकरणासाठी या सूचना अंमलात आणल्या जातील. सांडपाणी रोखण्यासाठी विभागीय कार्यालयाला सोबत घेऊन पाहणी केली जाईल, असे सांगितले.

यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिन हणबर, पाणीपुरवठा विभागाचे गुजर, ‘आप’चे जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील, युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी, सूर्यकांत पोटे, मुकुंद यादव, विशाल वठारे आदी उपस्थित होते.