चंदगड (प्रतिनिधी) : गळ्याला फास लागून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने खरीप हंगामात शेतीच्या मशागतीचा प्रश्न भेडसावणाऱ्या अलबादेवी (ता. चंदगड) येथील शेतकरी सुरेश घोळसे यांना बैलांची नवीन जोडी देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

अलबादेवी येथे गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा गळ्याला फास लागून मृत्यू झाल्याने शेतकरी सुरेश घोळसे यांचे ८० हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या शेतात भात, नाचणा लागवडीची कामे जोरात सुरू आहेत. अलीकडे पॉवर ट्रेलर, ट्रॅक्टर, रोटावेटरने शेती मशागतीची कामे केली जात असली तरी बैल किंवा रेड्यांच्या औताशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. खरीप हंगामात दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याने शेतीची मशागत करायची कशी? असा प्रश्न घोळसे यांना भेडसावत होता.

गावातील संजय पाडले, वैभव डांगे यांच्या पुढाकाराने तसेच अल्लूबाई मुंबई ग्रामस्थ मंडळ, आजी-माजी सैनिक, काशीबाई दळवी शिक्षण संस्थेच्या न्यू हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी, गावातील दानशूर लोकांनी मदत केली. मदतीच्या रुपाने जमलेल्या रकमेतून नवीन बैलांची जोडी खरेदी केली आणि घोळसे कुटुंबीयांना हे बैल देऊन माणुसकीचे दर्शन अलबादेवी ग्रामस्थांनी घडवले आहे.