मुंबई सीएसटीनजीकचा पादचारी पूल कोसळला : तिघे जागीच ठार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनजीकचा पादचारी पूल कोसळला. यामध्ये दोन महिलांसह एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अपूर्व प्रभू (वय ३५) रंजना तांबे (वय ४०), झहीद खान (वय ३२) अशी त्यांची नावे असून सुमारे ३४ जण जखमी झाले आहेत. मृत दोन्ही महिला एका खाजगी रुग्णालयाच्या कर्मचारी आहेत. ही दुर्घटना आज (गुरुवार) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अद्याप नेमक्या हानीचा आकडा हाती आलेला नाही. पण ऐन गर्दीच्या वेळी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना असू शकेल, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

सीएसएमटीकडून टाइम्स ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. संध्याकाळी ऐनगर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली. जखमींवर सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि सायन रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या भागात संध्याकाळी अतिशय गर्दी असते. महत्त्वाची ऑफिसेस या भागात असल्याने सगळ्यांची गर्दी ही सीएसटी स्टेशनकडे असते. हा पूल कोसळल्यामुळे प्रचंड धावपळ उडाली. पुलाखाली काही गाड्याही दबल्या गेल्या आहेत. मेट्रोचं कामही या भागात सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram