कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथे चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी चक्क कृषिपंपाच्या ध्यान मंदिर डीपीवरील १४ गाळ्यातील खांबावरील ॲल्युमिनिअमच्या लाखो रुपयाच्या तारा चोरुन नेल्या आहेत. दोन खांबदेखील मोडले आहेत. वेंगरुळ येथील ध्यान मंदिरापासून पूर्वेकडे ही कृषिपंपाची लाईन गेली आहे.

या लाईनवर ८ ते १० शेतकऱ्यांचे कृषिपंप आहेत. या लाईनवर प्रकाश देसाई यांच्या शेतात झाडाची फांदी पडून एका गाळ्यातील तारा खाली पडल्या होत्या. या तारा जोडण्यासाठी वारंवार कडगाव उपविभागास शेतकऱ्यांनीू सांगूनदेखील या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. लाईन बंद असल्याने चोरट्यांनी याचाच फायदा घेत सर्व तारा चोरून नेल्या आहेत. या कृषिपंपाच्या लाईनवर गडदूवाडी येथील व्हिलेज लाईन क्रॉस आहे. तरीदेखील ही लाईन रात्रीची बंद करुन हा धाडसी चोरीचा प्रकार कोणी केला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महावितरणकडे महिनाभरापूर्वी कळवून देखील या तारा का जोडल्या नाहीत? हा प्रश्न देखील अनुत्तरीत आहे. एकूणच या लाईनवरील शेतकऱ्यांचे विद्युत पंप हे विहिरी व ओढ्यावर असून, या विहिरींना अतिशय कमी पाणी असते. त्यामुळे या शेतकऱ्यांचा शेतातील पिकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अपुऱ्या पाण्यामुळे आणि त्यातही तारा चोरून नेल्याने विजेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

पोलिस प्रशासनाने घटनेची ताबडतोब चौकशी करुन दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. महावितरणने ही लाईन जोडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी आग्रही मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.