कोतोली (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्याच्या दक्षिण भागात गेल्या चार  दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. कांटे आणि बुरंबाळ गावाला जोडणारा भाताडीच्या ओढ्यावरील पूलाचा भराव पावसामुळे गेला. त्यामुळे वाहतूक बंद पडल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

गेल्या वर्षी आलेल्या महापुरामध्ये या पुलावरील भराव पूर्णपणे वाहून गेला होता. गावचे सरपंच अशोक बारस्कर आणि उपसरपंच मारुती पाटील यांनी स्वतः खर्च करून या पुलावर भराव टाकून वाहतूक सुरळीत केली होती. मात्र, जबाबदार यंत्रणनेने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे बुरंबाळ रस्त्याला कोणी वाली नसल्यासारखी अवस्था झाली आहे.  बुरंबाळ पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. कोणताही ठोस उपाय न केल्यामुळे हा भराव वाहुन गेला आहे.

गावातून बाहेर जाण्यास हाच एकमेव रस्ता आहे. त्यावरील वाहतूक बंद झाल्यामुळे विद्यार्थी, नागरिक, दूध वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले वर्षभर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदस्तरावर पाठपुरावा करूनसुद्धा अधिकारी, पदाधिकारी यांच्याकडून फक्त आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.