सोनिया गांधींच्या ‘पी.ए.’ने केला पक्षत्याग…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी काँग्रेसला आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा झटका बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टॉम वडक्कन यांनी आज (गुरुवार) भाजपामध्ये प्रवेश केला. टॉम वडक्कन हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जात होते. इतकंच नाही तर ते काँग्रेच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव म्हणून कामही केलंय. टॉम वडक्कन यांनी माजी पंतप्रधान आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी यांचे सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भाजपामध्ये वडक्कन यांचं स्वागत केलंय. त्यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली. टॉम वडक्कन केरळच्या त्रिशूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दीर्घकाळापासून ते काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही काम केलंय. त्यांनी पक्षत्याग करताना म्हटले की, काँग्रेसमध्ये वंशपरंपरेचं राजकारण फोफावतंय. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मी दु:खी आहे. काँग्रेस पुलवामा हल्ल्याचंही राजकारण करत आहे. त्यामुळे मी काँग्रेसला सोडत आहे. जेव्हा तुम्ही देशाच्या सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता तेव्हा दु:ख होतं. काँग्रेस सोडणं आणि भाजपामध्ये सामील होणं हा विचारसरणीचा नाही तर देशप्रेमाचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram