कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका १८ ऑगस्ट रोजी होत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने ऐन पावसाळ्यातच निवडणुकीचे रणसंग्राम कशा पद्धतीने रंगणार हे पाहावे लागणार आहे. त्यातच कोल्हापूर जिल्हा हा अतिवृष्टीचा असल्याने पावसाळ्यात या जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीनिमित्त प्रशासन मतदारांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आणि सर्वच राजकीय पक्षांना प्रचार यंत्रणा कशी राबवायची, हा प्रश्न पडणार आहे.

दरम्यान, या नगरपरिषदांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याबाबत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राज्य निवडणूक आयोगापुढे प्रस्ताव ठेवणार का? किंवा तशी मागणी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात सत्तांतर घडल्यानंतर लगेचच नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापणार असून, ऐन पावसाळ्यात मतदान होत असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे. शिवाय राज्यातील ९२ नगरपरिषदांची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यावी लागणार, असे सध्याचे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, वडगाव, मलकापूर, गडहिंग्लज, पन्हाळा, कागल, जयसिंगपूर या आठ नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्टला होत आहे. यापैकी शिरोळ, मलकापूर, पन्हाळा, मुरगूड या या गावांना अतिपावसाचा फटका बसतो. कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागाला पुराचा तडाखा बसत असल्याने जिल्हा प्रशासनाला पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. अशा स्थितीत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे राबवावयाची, याचे मोठे आव्हान असणार आहे.

१८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, १९ ऑगस्टला मतमोजणी होऊन कारभारी कोण हे ठरणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून २० जुलैला रीतसर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्यास २२ ते २८ जुलैपर्यंत अवधी असून, २९ जुलै रोजी छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यास ४ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे; परंतु ऐन पावसाळ्यात मतदारांपर्यंत प्रचारासाठी कसे पोहोचायचे हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना सतावणार आहे.

नोकरी वा कामाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक मतदार बाहेरील मोठ्या शहरात वास्तव्यास असल्याने हे नोकरदार ऐन पावसाळ्यात आपापल्या न.पा.च्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क कशा पद्धतीने बजावणार, या प्रश्नाने देखील राजकीय पक्षांची चिंता वाढणार आहे.