कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शाहूनगरमध्ये राज्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘काल-आज आणि उद्याही उद्धव आम्ही तुमच्या सोबतच’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले. गद्दार अमदारांवर कारवाई करावी, अशा घोषणा देण्यात आल्या. बंडखोर आमदारांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली.

मातोश्रीवरून आदेश आल्यावर आमदार-खासदार यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक घरावर तुळशी पत्र ठेवून कामाला लागतो. हेच लोकप्रतिनिधी पैशाच्या लोभापोटी आपले इमान घाण ठेवून पक्षाशी गद्दारी करतात. या बंडखोर आमदारांविरोधात, तर ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन जुन्या शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

या कार्यक्रमाचे नियोजन हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू सांगावकर यांनी केले होते. यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष दिनेश परमार, शाखाप्रमुख अनिरुद्ध सांगावकर, मारुती पवार, दिलीप सांगावकर, सीताराम कुराडे, योगेश शिंदे, उदय जाधव, तात्या दळवी, नेताजी पाटील, बाळासाहेब नलवडे, मारुती सांगावकर, तायाप्पा कांदेकर, शिवाजी शिंदे, गंगाराम धोत्रे, मामा फडतरे असे जुने आजी-माजी शिवसैनिक उपस्थित होते.