कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कौन्सिल ऑफ ‘आर्किटेक्चर’ या शिखर संस्थेने यावर्षी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश निकषांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता १२ वी परीक्षेतील किमान गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. १२ वी उत्तीर्ण आणि ‘नाटा’ किंवा ‘जेईई’ पात्र असलेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.

‘आर्किटेक्चर’ अभ्यासक्रमासाठी यापूर्वी १२ वी व डिप्लोमासाठी अग्रीगेट व पीसीएमला ५० टक्के गुण असणे व  ‘नाटा’ परीक्षेत उत्तीर्ण असणे अनिवार्य होते; मात्र चालू शैक्षणिक वर्षासाठी हे निकष शिथिल करण्यात आले आहेत. केवळ यावर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता नव्या निकषाप्रमाणे केवळ १२ वी उत्तीर्ण व ‘नाटा’ किवा ‘जेईई’ पात्र असलेले विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेशासाठी पात्र ठरतील, असे ‘कौन्सिल ऑफ ‘आर्किटेक्चर’ने जाहीर केले आहे. त्यामुळे केवळ ५० टक्के गुणाच्या निकषामुळे प्रवेशाची संधी हुकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘आर्किटेक्चर’ अर्थात वास्तुशास्त्रज्ञ पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्याना देश-विदेशात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु करता येतो. बांधकाम व वास्तूशास्त्र विषयक कंपनीमध्ये नोकरी, सरकारी नोकरी, शिक्षक म्हणून नोकरी असा अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे बदलेल्या निकषांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ‘आर्किटेक्चर’ क्षेत्रातील उत्तम करिअरच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.