टोप, कुंभोज (प्रतिनिधी) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ महामार्गावर नादुरुस्त होऊन थांबलेल्या कंटेनरला पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारची धडक झाली आणि याच कारला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिल्याने या विचित्र अपघातात कारमधील तिघेजण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही कर्नाटकातील बंगळुरू येथील आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री झाल्याचे वडगाव पोलिसांनी सांगितले.

या धडकेत कारमधील त्रिलोकेश कुमार (वय ४२), संजना माहेश्वरी (वय २७), जिथ्या त्रिलेश (वय २१, सर्व रा. साईकापल्ली मीनाक्षीनगर, कामाक्षीपल्ल्या, बंगळुरू) अशी ठार झालेल्या तिघांची नावे आहेत, तर अरिनी एन. (वय ४१, बसवेश्वर नगर बंगळुरू) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ रात्रीच्या सुमारास महामार्गावर गाडीचा अॅक्स्ल तुटल्याने महामार्गावर आयशर कंटेनर थांबला होता. कंटेनर लावताना कोणतीही दक्षता घेतली नव्हती. दरम्यान, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बंगळुरूहून पुण्याच्या दिशेने निघालेली ही कार या महामार्गावर थांबलेल्या कंटेनरमध्ये घुसली. काही क्षणातच पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात तिघे जागीच ठार झाले.

राष्ट्रीय महामार्गावरील वारणा नदीवरील पुलाच्या उतारावर वळणावर हा कंटेनर उभा केला होता. कार चालकास रात्री तो नीट दिसला नाही. महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला रिफ्लेक्टर अथवा बॅरिकेडस लावलेले नव्हते. ही बाब कार चालकाच्या लक्षात न आल्याने पाठीमागून ही कार कंटेनरमध्ये घुसली. अपघातस्थळी होमगार्ड धोंडिराम वड्ड (रा. किणी, ता. हातकणंगले) यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करून गाडीतील मयत व जखमींना गाडीबाहेर काढले. अपघातस्थळावरील वाहने वडगाव पोलिसांच्या मदतीने बाजूला करण्यात आली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची नोंद वडगाव पोलिसांत झाली असून, अपघातानंतर ट्रक व कंटेनरवरील चालक हे जखमींना मदत न करता तेथून पळून गेल्याचे फिर्यादी धोंडिराम वड्ड यांनी सांगितले. महामार्गावर निष्काळजीपणे कंटेनर लावल्याने चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करत आहेत.