कोल्हापूर (प्रतिनिधी) : केवळ आम्हाला विरोध म्हणून एकत्र आलेल्या विरोधकांची निवडणूक लढण्यापूर्वीच दमछाक झाल्यामुळे सूज्ञ सभासद त्यांना सपशेल नाकारतील, असा ठाम विश्वास शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष, पॅनेलप्रमुख राजाराम वरुटे यांनी व्यक्त केला. ते मुरगूड, ता. कागल येथे प्रचार मेळाव्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे नेते शिवाजी पाटील होते.

विरोधकांमध्ये समन्वय नसल्याने त्यांच्या हाती बँकेची सत्ता दिली तर बँकेवर २००९ पूर्वीची परिस्थिती ओढवल्याशिवाय राहणार नाही. बँकेची अस्मिता जपण्यासाठी सूज्ञ सभासदांनी ही लढाई हातात घेतल्यामुळे सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्‍चित असल्याचे वरुटे यांनी सांगितले.

वरुटे म्हणाले, विरोधकांनी खोटी पत्रकबाजी करून सभासदांची दिशाभूल चालू केली आहे. २००९ पूर्वीची बँकेची स्थिती व सध्याची स्थिती सभासद जाणून आहेत. रिझर्व्ह बँकेने सोसायटी करण्याचे निर्देश दिले असताना २००९ साली सत्तेत आलेल्या संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घेऊन काटकसर व पारदर्शक कारभार करून बँक वाचवली हे सभासद कदापि विसरणार नाहीत. विरोधकांतील असमन्वय, कटकारस्थान, पूर्वेतिहास सभासदांना ज्ञात असल्यामुळे या वाचाळवीर मंडळींना सभासद जवळ करणार नाहीत, असेही ते म्हणाले.

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले, विरोधक खोटी पत्रकबाजी करून शिक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत: पण या खोट्या सहानुभूतीला सभासद कदापिही थारा देणार नाहीत. बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक अस्मिता असणाऱ्या सभासदांची विरोधकांनी थट्टा चालू केली असून, खोटी आकडेवारी सादर करून किमान एक मत तरी द्या अशा विनवण्या चालू आहेत; पण अशा प्रवृत्तीला सभासद हद्दपार केल्याशिवाय राहणार नाहीत.

यावेळी सुकाणू समितीचे शिवाजी पाटील, माजी संचालिका कावेरी चव्हाण, गजानन गुंडाळे, शिक्षक सेनेचे कृष्णात धनवडे, पेशन संघटनेचे सर्जेराव सुतार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी संचालक वसंत जाधव, प्रवीण अंगज, दस्तगीर फकीर, उत्तम पाटील, बाबाजान पटेल, आर. बी. जाधव, विश्वनाथ डफळे, विजय पाटील, संदीप शिंदे, आनंदा पाटील, शिवाजी देवाळे, उत्तम पाटील, जयवंत हावळ, रेखा चव्हाण, माजी संचालिका कावेरी चव्हाण, मनीषा पाटील, सुरेखा पवार,  आमीनाबी पटेल, सविता पाटील, वैशाली मांडे, सारिका रामसे आणि शिक्षक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वागत वसंत जाधव यांनी, प्रास्ताविक संचालक जी. एस. पाटील यांनी, सूत्रसंचालन विश्वनाथ डफळे, संदीप डफळे, राहुल कुंभार, संदीप शिंदे यांनी केले. उत्तम पाटील यांनी आभार मानले.