कोल्हापूर (प्रतिनिधी) :  एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या लोकप्रतिनिधींपैकी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनाही गेले आठ ते दहा दिवस कोल्हापूरात टिकेचे धनी व्हायला लागले होते. पण आता शिंदे सरकार आल्यामुळे राजेश क्षीरसागर यांचे कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वजन वाढले आहे. सरकार असेपर्यंत शिंदे सरकारचा आदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात राजेश असेच राजकीय वातावरण असणाऱ आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर कोल्हापूरातून त्यांचे जवळचे अनुयायी आणि कट्टर शिवसैनिक असणारे राजेश क्षीरसागर यांनीही शिंदे यांच्या मागून जाणे पसंत केले. वास्तविक यावेळी क्षीरसागर यांनी ठाकरे हे आमचे दैवत आणि एकनाथ शिंदे हे माझे गुरु असून त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे या आणिबाणीच्या काळात त्यांनी शिंदेंच्या बरोबर जाणे पसंत केले. वास्तविक क्षीरसागर यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल त्यांच्यावर कोल्हापूरातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून टिकेची झोड उठली. त्यांची भूमिका चुकीची आहे हे शिवसेनेच्या काही नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. क्षीरसागर यांच्या घरात शिवसेनेचा मोर्चाही निघाला आणि घोषणाबाजीही झाली. इतकच नव्हे तर शिवसेनेच्या फलकावरील क्षीरसागर यांचे फोटोही फाडून काढण्यात आले.

आठदहा दिवसांच्या या तणावपूर्ण वातावऱणानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे कोल्हापूरातून राजेश क्षीरसागर वरचढ ठरल्याचे दिसून आले. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या तीनही जिल्ह्यातून क्षीरसागर यांना महत्व प्राप्त झाले आहे. आमदार नसतानाही त्यांनी शिंदेच्या पाठराखणीसाठी थेट गुवाहटी गाठली. शिवसेनेच्या काही नेत्यांनी क्षीरसागर यांना गद्दार संबोधले होते. मात्र, गेल्या तीस वर्षातील आपण केलेल्या कार्याचा पाढा क्षीरसागर यांनी वाचून दाखवला.

क्षीरसागर यांनी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी यांच्याशी घेतलेले वितुष्ट त्यांना महागात पडेल, अशी भावना कोल्हापूरात व्यक्त होत राहिली. इतकच काय त्यांचे राजकीय करीयर देखील आता संपलं अशा चर्चा रंगू लागल्या. पण, शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे राजेश क्षीरसागर यांचा निर्णय योग्य ठरल्याचे दिसून आले आहे. आता शिंदे सरकारमुळे राजेश क्षीरसागर यांचे वजन चांगलेच वाढले असून त्यांची साथ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर दिसून येईल यात शंका नाही. क्षीरसागर यांच्याकडे यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष हे पद होते. तर आगामी काळात मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गटाचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी राजेश क्षीरसागर यांच्यासारख्या खंद्या साथिदाराला आमदारीबरोबर मंत्रीपदही देतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

एकदंरच एकनाथ शिंदे सरकारच्या काळात क्षीरसागर यांच्याकडे बऱ्यापैकी सुत्रे राहतील. क्षीरसागर यांचे काही निर्णय सरकारपर्यंत पोहचतील आणि ते मान्यही होतील. यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी बाळासाहेबांचा आदेश पुन्हा कधीच नाही राजेश असा डंका पिटला गेला होता. पण, क्षीरसागर समर्थक आता शिंदे सरकारचा आदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात राजेश अशी टॅगलाईन ठासून सांगत आहेत.