कोल्हापूर (प्रतिनिधी) : सत्ताधारी संचालक मंडळ व सुकाणू समितीच्या दूरदृष्टीच्या आणि काटकसरीच्या कारभारामुळे शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेला नवा आयाम दिला असून, बँकेला सध्या जे सन्मानाचे दिवस आले आहेत त्याचे सर्वस्वी श्रेय हे सत्ताधारी संचालक, सुकाणू समिती व सूज्ञ सभासदांना जाते, असे मत शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी व्यक्त केले.

ते जि.प. कर्मचारी सोसायटी येथे करवीर तालुक्यातील शिक्षकांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी सुकाणू समिती सदस्य पी. के. पाटील होते. ते म्हणाले, व्यवसायवृद्धी, सभासदांचा विश्वास, कर्जावरील कमी केलेला व्याजदर,नियमितपणे डिव्हिडंड वाटप, ठेवीमध्ये झालेली लक्षणीय वाढ यामुळे शिक्षक बँक भक्कम स्थितीत आहे. गेल्या १३ वर्षात व्याजदर १५ टक्केवरून खाली आणत १० टक्के व्याजदर केला आहे. भविष्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या नियमाप्रमाणे याच्यापेक्षाही व्याजदर कमी करू.,विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, सभासदांनी वास्तव अभ्यासावे. आम्ही सक्षम विरोधक होतो म्हणून बँकेची प्रगती झाली, असा कांगावा करणाऱ्यांनी सद्सदविवेक बुद्धीने सत्ताधारी मंडळीच्या कामाचा लेखा जोखा मांडावा.

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त शिक्षक संघात असून, आंतरजिल्हा बदलीसाठी पाठपुरावा, एमएससीआयटी  अट, मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय या शिक्षकाना जाचक असणाऱ्या निर्णयाविरोधात शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट) मंत्रालयीन स्तरापासून उंबरठे झिजवले आहेत. सत्ताधारी पॅनल सत्तेवर येताच डीसीपीएस मयत सभासद कल्याण निधीत वाढ करण्याचा निर्णय पहिल्याच बैठकीत जाहीर करणार आहे, असे वरुटे म्हणाले.

एका पक्षाचा राजाध्यक्ष मला चेअरमन करतो असा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव होता,असे सांगून खोटेपणाचा कळस गाठत आहे. तुम्हाला चेअरमन करायला सत्ताधारी गटात माणसे नाहीत का? असे म्हणताच उपस्थितांनी ‘जय शिक्षक संघ’ म्हणत टाळ्यांचा एकच कडकडाट केला. खोटी दिशाभूल करून स्वार्थ साधणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा असे वरुटे म्हणाले.

विद्यमान संचालक संभाजी बापट म्हणाले, बँक चालवण्याची क्षमता केवळ सत्ताधारी मंडळीत असून, स्वार्थासाठी एकत्र आलेली मंडळी बँकेचे काय करतील, याचा सूज्ञ सभासदानी विचार करावा. बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले, सध्या बँकेकडे ३८० कोटीच्या घरात ठेवी असून, २७० कोटीच्या आसपास कर्जे वाटप केली आहेत. स्वार्थासाठी एकत्र आलेले कधीच एकत्र राहू शकत नाहीत किंवा सभासदांचा विश्वास संपादन करू शकत नाहीत. सभासदाभिमुख कारभार करणाऱ्या शिक्षक संघाच्या पाठीशी राहून सत्ताधारी पॅनेलच्या सर्वच्या सर्व १७ निवडून देऊन विजयाची हॅट्ट्रिक साधावी.

यावेळी सुकाणू समितीचे दिलीप बच्चे, संचालक बजरंग लगारे, उमेदवार बाबा साळोखे, उमेदवार मारुती दिंडे, लता नायकवडे, दुर्गम शिक्षक संघटनेचे नागेश शिणगारे, शिक्षक सेनेचे कृष्णात धनवडे, डीसीपीएस संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाडळकर, संतोष गायकवाड, समन्वय समितीचे सचिव सर्जेराव सुतार, श्‍वेता खांडेकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक विद्यमान संचालक प्रशांत पोतदार, स्वागत मारुती दिंडे, सूत्रसंचालन संभाजी पाटील केले. आभार करवीर पतसंस्थेचे संचालक ज्ञानदेव यादव यांनी मानले.