युनायटेड बेबी लीग फुटबॉल : ‘शिवाजी, साधना, शिवराज’ला विजेतेपद

गडहिंग्लज (प्रतिनिधी)  :  गडहिंग्लज येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेन्ट कन्सोल ग्लोबल फाऊंडेशन (टीसीजी) मार्फत बेबी लीग फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. फुटबॉल स्पर्धेत बारा वर्षे गटात साधना हायस्कूल, दहा वर्षे गटात शिवाजी विद्यालय यांनी आणि आठ वर्षे गटात शिवराज स्कूलने विजेतेपद पटकाविले. तर निपाणी फुटबॉल अकॅडमी, न्यू होरायझन स्कूल आणि सर्वोदया स्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. निपाणीचा जित फुटाणकर, शिवाजी विद्यालयाचा आदित्य मांडे आणि सर्वोदयाचा रोमन शहाचा ‘हिरो ऑफ दि टूर्नामेंट’ म्हणून सत्कार करण्यात आला.

येथील एम. आर हायस्कूलच्या मैदानावर गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत तीन गटात एकूण ३४  संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत बारा वर्षे गटात साधना हायस्कूलने सर्वाधिक ३७  गुण मिळून विजेतेपद पटकाविले. निपाणी फुटबॉल अकॅडमी ३३ गुणांसह उपविजेता ठरला. साई इंटरनॅशनल स्कूल ३२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर तर सर्वोदया स्कूल २९  गुणासह चौथ्या क्रमांकावर राहिला. दहा वर्षे गटात छ. शिवाजी विद्यालयाने सर्वाधिक म्हणजेच ३७ गुणांसह अजिंक्यपद मिळविले. न्यू होरायझन स्कूलला ३२  गुणांसह उपविजेता तर साधना ३० गुणांसह तिसऱ्या आणि सर्वोदया २९  गुणांसह चौथ्या स्थानावर राहिले.

टीसीजी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंचानाळकर, युनायटेडचे उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर, संचालक सुरेश कोळकी, संजय पाटील, राजू भोपळे, गंगाराम नाईक, जिनगोंडा पाटील, प्रसाद गवळी, मनिष कोले यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांना किट, फुटबॉल आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रवीण रेंदाळे, प्रसन्न प्रसादी, यासीन नदाफ, अजित शिंदे, सचिन बारामती आदी उपस्थित होते. स्पर्धा संयोजक दीपक पवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. समन्वयक ओंकार घुगरी, ओंकार सुतार, सुलतान शेख यांचा गौरव झाला. कुपिंदर पवारने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे