मुंबई (प्रतिनिधी) : शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचे एक केंद्रीय मंत्री नारायण राणे देतात, ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करावे. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगत राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला.

महाराष्ट्रातील अभूतपूर्व राजकीय उलथापालथीदरम्यान क्षणोक्षणी नवनवे अपडेट समोर येत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर तसेच भाजपवर टीकेची झोड उठवली. शरद पवारांविषयी नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटचाही त्यांनी समाचार घेतला. पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी ट्वीटरवरूनही भाजपवर टीका केली आहे. बंडखोर आमदारांची संख्या ही केवळ कागदावर असल्याचे म्हटले आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे सभागृहामध्ये हा विषय येईल तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूने आमदारांचा कौल असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.