कुरुंदवाड (प्रतिनिधी) : वाळू उपसा करण्यासाठी बंदी असताना गौरवाड, ता. शिरोळ येथील पाणवठ्याजवळ शासकीय सुट्टीचा फायदा उचलत गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळेस लाखो रुपयांची वाळूची चोरी झाली आहे. या चोरीच्या वाळूचा डेपो कवठेगुलंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ही चोरी काही माजी ग्रा.पं सदस्यांनी केल्याची चर्चा आहे. गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

एक दिवस आड करून रात्रीतून वाळू चोरीचा प्रकार सुरू असतो. याची माहिती काही ग्रामस्थांनी मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि पोलीस पाटलांना देण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क झाला नाही. महाराष्ट्रात वाळू उपसा करण्यास बंदी असल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. एक ट्रॅक्टर ट्रॉली १५ हजार, १ ट्रक ४० हजाराला वाळूची विक्री केली जात आहे. यामध्ये काही प्रमाणात कोळसा व क्रश सॅड मिक्स करून भेसळयुक्त वाळू विक्री केली जात आहे.

गौरवाड पाणवठ्याजवळ जलसाठा कमी झाल्यामुळे पात्र कोरडे पडून वाळू उघड्यावर पडली आहे. वाळू माफियांना जणू ही लॉटरीच लागली आहे. त्यामुळे रात्रीस चाले खेळ करत ट्रॅक्टर ट्रॉलीतून गेल्या तीन दिवसांत लाखो रुपयांची हजारो ब्रॉस वाळूची चोरी झाली आहे.

गौरवाड पाणवठ्याचे पात्र प्रशस्त रुंद आहे. कृष्णा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासून ट्रॅक्टर ट्रॉलीने नदीपात्रातून वाळूची चोरी सुरू आहे. गावातील काही माजी ग्रा.पं सदस्यांनी व काही ट्रॅक्टर चालकांनी गौरवाडातील काही युवकांची वाळू भरणारी टोळी तयार करून एक डबा भरून देण्यासाठी ५ हजार रुपये मेहनताना दिला आहे. तीच वाळू १५ हजार रुपये दराने गावातच विक्री केली आहे. कवठेगुलंद रस्त्यावर पटेल वस्तीजवळ असंख्य ब्रॉस वाळूचा साठा करण्यात आला आहे.

या वाळू चोरीत वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या नंबर प्लेटा काढून वाळू चोरांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. वाळू चोरी प्रकरणी स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी करून वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दूरवर पाणवठ्याजवळ वाळू चोरीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर व चोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे तलाठी अश्विनी खराडे यांनी सांगितले.