साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते, सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस दलाकडून ‘सक्षम शाळा सदृढ शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मुलांचे स्वागत केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, पोलिसांनी ‘सक्षम शाळा सदृढ शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सामाजिक भान, कायद्याचे ज्ञान असावे. त्यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सर्व पोलिस अधिकारी हे एक-एक शाळा दत्तक घेणार आहेत. बालविवाह रोखणे हा देखील पोलिसांचा उद्देश आहे.

गगनबावडा सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील म्हणाले, शाळांमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. असे प्रकार व अन्य कोणतेही अनुसूचित प्रकार घडत असतील तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.