मुंबई : (प्रतिनिधी)  : राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्ष नेत्याकडून सर्व पक्षाचा मिळून एकच उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे, तर भाजप आपला वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे समजते.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव चर्चेत होते; मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाव्यतिरक्त आता दुसऱ्या नावांची चर्चा सुरु आहे. शरद पवारानंतर आता महाराष्ट्रातून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असून, काही आमदार-खासदारांशी संपर्कात  असल्याचे अभिजित बिचुकले यांनी सांगितले आहे.

अभिजित बिचुकले  म्हणाले, मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या काही आमदार-खासदारांशी सह्यांसंदर्भात संपर्कात आहे. मी बहुजन समाजातला आहे. निर्व्यसनी, सुशिक्षित असून, मला कायद्याची माहिती आहे. कोल्हापूर, पुण्यातल्या खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आता अभिजित बिचुकले यांना कोण कोण पाठिंबा देतात आणि बिचुकले राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक लढवतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.