नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना सक्रिय राजकारणातून दूर जायचे नसल्यामुळे त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे, असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आपल्याला जनतेची सेवा करत राहायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर पक्षीय राजकारणापासून दूर व्हावे लागते. त्यामुळेच पवारांनी यापूर्वीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे म्हटले होते.

राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक राष्ट्रपतीपदासाठी सर्वमान्य असा चेहरा शोधत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षांच्या बोलावलेल्या बैठकीत शरद पवारांच्या नावाला सगळ्यांनी दुजोरा दिला होता; पण उमेदवार होण्यास पवारांनी नकार दिला आहे.

काही वर्षांपूर्वी राष्ट्रपती निवडणूक न लढवण्याबद्दलची भूमिका मांडताना शरद पवार म्हणाले होते की, ‘मला इतक्या लवकर राजकारणातून निवृत्त व्हायचे नाही. जेव्हा तुम्ही राष्ट्रपती बनता तेव्हा तु्म्हाला चांगली हवेली मिळते, पण तुम्हाला लोकांना/माध्यमांना भेटण्याची संधी मिळत नाही.’ हेही एक कारण पवारांची निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेमागे असू शकते.

राष्ट्रपती निवडणुकीनंतर देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवरही शरद पवारांची नजर आहे. शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य समजले जाते. सक्रिय राजकारणातील स्थान शरद पवार कायम ठेवू इच्छित असावेत. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहेत.  त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहतो. सुप्रिया सुळे राजकारणात असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक गट असल्याचेही वारंवार समोर आले आहे.

शरद पवार राष्ट्रपती झाले तर त्यांना पक्षापासून दूर व्हावे लागेल आणि कदाचित राष्ट्रवादी पक्षात फूट पडण्याची शक्यता घेऊनच त्यांनी सक्रिय राजकारणात राहावेसे वाटते. तसेच खा. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीत आणि राजकारणात प्रस्थापित करण्याची चिंता शरद पवारांना असल्यामुळेच त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याची चर्चा आहे.

बिकट स्थितीत गेलेली काँग्रेस आणि दूर होत असलेले मित्रपक्ष अशा स्थितीत २०२४ च्या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याची मागणी सातत्याने होत आहे.  महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांचे सर्वच राजकीय पक्षाशी, नेत्यांनी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेही शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास उत्सुक नसावेत, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.