कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुईकर कॉलनी येथील मनपाच्या हिंद विद्यामंदिर क्र. २२ मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. नवागत मुलांना फुग्यांनी सजविलेल्या ओपन टप जीपमधून भागातून ढोल ताश्यांच्या गजरात फेरी मारण्यात आली.

शाळा आणि परिसर रंगबेरंगी फुगे, रांगोळी, फुले आणि तोरण यांनी सजवलेला होता. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प, पेढे व कॅन्डी चॉकलेट देऊन आणि त्यांचे औक्षण करण्यात आले. नवागत गौरी-शंकर यांच्या सोनपावलांच्या ठशातून शाळेत प्रवेश करण्यात आला.

या उत्साहाच्या वातावरणात निरागस चेहर्‍यांवर हसू आणि निर्भय छटा खुलून आल्या आणि मोठ्या आनंदाने मुले शाळेत दंग झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांना स्कूल बॅग आणि सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तकाचे  वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेविका उमा इंगळे, उदय इंगळे, परिख, हिंद विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक मनोहर सरगर, विजय सुतार, प्रिया शिंगण, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.