अयोध्या (वृत्तसंस्था) : अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी येथे एक सुसज्ज ‘महाराष्ट्र सदन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पत्रकार परिषेदत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे हे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आमची ही तीर्थयात्रा असून, राजकीय यात्रा नाही. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की, मी स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोलणार आहे. अयोध्यतेत ते महाराष्ट्र सदनासाठी जागा मागणार आहेत. सुमारे १०० खोल्यांचे प्रशस्त सदन या ठिकाणी आपण करणार आहोत.  गेल्या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहोत. उत्साह आणि जल्लोष तसाच आहे. मंदिर निर्माण होत असताना आज देशभरातून शिवसैनिक अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आले आहेत. २०१८ मध्ये आम्ही अयोध्येत आलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘आधी मंदिर नंतर सरकार’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर योगयोगाने मंदिराच्या बाजूने निकाल लागला आणि संपूर्ण प्रकिया झाली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुका आणि राजकारण यांचा अयोध्या दौऱ्याशी काहीच संबंध नाही. शक्ती आणि भक्ती आमच्यासाठी एकच आहे. आमची भक्ती हीच आमची शक्ती आहे आणि हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्हाला शक्तिप्रदर्शनाची गरज नाही. मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी कोणाच्या अटी-शर्ती नाही. अयोध्येत आमचे साधूमहंतांकडून स्वागत करण्यात आले. आम्ही सेवाभावाने येथे आलो आहोत. ७० च्या दशकात इस्कॉन मंदिराला बाळासाहेबांनी भेट दिली होती. त्यामुळे इस्कॉन ट्रस्टने मला बोलावल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणे टाळले. माझे भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.