नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते; पण आता यासाठी ग्राहकाला ७५० रुपये अधिक म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागणार आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रतिसिलिंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर ग्राहकाने दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर त्याला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार असून, यासाठी ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी २९०० रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. त्याचप्रमाणे रेग्युलेटरसाठी १५० रुपयांऐवजी २५० रुपये द्यावे लागणार आहेत.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतर्फे असे सांगण्यात आले की, ५ किलोच्या सिलिंडरची सुरक्षा रक्कम आता ८०० रुपयांऐवजी ११५० रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही या नव्या दरांच्या अंमलबजावणीमुळे धक्का बसणार आहे. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनी त्यांच्या कनेक्शनवर सिलिंडर दुप्पट केल्यास त्यांना दुसऱ्या सिलिंडरसाठी वाढीव सुरक्षा रक्कम जमा करावी लागेल. दरम्यान, नवीन गॅस कनेक्शनसह येणाऱ्या पासबुकसाठी ग्राहकांना २५ रुपये आणि पाईपसाठी १५० रुपये मोजावे लागतील. नवीन कनेक्शनची किंमत सहसा अशा सर्व खर्चाचा समावेश करते; मात्र गॅस सिलिंडरसह स्टोव्ह घेण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.