पुणे (प्रतिनिधी) : देहू येथील संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले; पण या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

या कार्यक्रमात अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते; परंतु सूत्रसंचालकाने थेट नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला; परंतु अजित पवार तुम्ही बोला असे म्हणाले. आता अजित पवारांना भाषण का करु दिले नाही याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या प्रकारावरून राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाला असून, ठिकठिकाणी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात येत आहे. दुसरीकडे देहू येथील मंदिर समितीतर्फे नितीन मोरे यांनी अजित पवार यांचे नाव पंतप्रधान कार्यालयास देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावे, अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती; पण पीएमओने त्याला काही उत्तर दिले नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते; पण त्यांना बोलू दिले नाही.’

संतांच्या दरी तरी राष्ट्रवादी पक्षाने राजकारण करू नये. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना भाषण करा, असे म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनीच भाषण करण्यास नकार दिला होता, असे भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.