कागल (प्रतिनिधी) : ‘मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे; मात्र मंत्रिपदाची हवा कधीही डोक्यात शिरू दिली नाही. मी मंत्री असलो तरी गोरगरीब जनतेचा हमाल आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करीत राहीन, असेही ते म्हणाले. करंजिवणे, ता. कागल येथे विविध विकासकामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत ते होते. अध्यक्षस्थानी एम. एस. पवार होते.

मुश्रीफ म्हणाले, सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे ग्रामीण विकासासाठी निधी देण्याचे काम माझ्याकडे आहे. प्राथमिक शाळा दुरूस्तीसाठी, क्रीडा संकुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करणार असून, प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी निधीसाठी पाठपुरावा करावा. विधवासंबंधातील सर्वच जुनाट कुप्रथा मोडीत काढावयात, तसेच प्रत्येक गावांत विधवा माता-भगिनींचा सन्मान केला पाहिजे.  यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती शशिकांत खोत, उत्तम टेंबुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. युवराज लाड, संजय आंग्रे, सरपंच दगडू शेटके, अन्नपूर्णा शुगरचे संचालक राजेश भराडे, उपसरपंच वंदना पोवार, सुधीर मासवेकर, बाबूराव शेटके, बाळासाहेब तुरंबे, आदी उपस्थित होते.