मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु असून सात उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यासाठी भाजपाकडून धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पीयूष गोयल हे रिंगणात आहेत. शिवसेनेकडून संजय पवार आणि संजय राऊत, काँग्रेसक़डून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार आहेत. निवडणुकीपूर्वी झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे ही लढत चुरशीची होणार हे निश्चित आहे.

आत्तापर्यंत २४० आमदारांनी मतदान केले आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात दाखल झाले आहेत. तर काँग्रेसच्या ४४ आमदारांच मतदान पूर्ण झाले आहे. शुक्रवारी सकाळी नऊ  वाजेपासून राज्यसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दीड तासांत १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या ६०हून अधिक आमदारांनी मतदान केले असून काँग्रेसच्याही जवळपास २० आमदारांनी मतदान केले आहे. पावणे अकरावाजेपर्यंत जवळपास ५०  टक्के मतदान पूर्ण झाले होते. दुपारी दोन वाजेपर्यंत मतदान पूर्ण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारला मुंबई हायकोर्टानं पुन्हा धक्का दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीची परवानगी नाकारली आहे. याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत पुन्हा नव्यानं याचिका करण्यात आली आहे. थोड्याच वेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार पार पडणार आहे.

जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर भाजपाने आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटलांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर यशोमती ठाकूरांनीही नाना पटोलेंच्या हाती मतपत्रिका दिल्याने भाजपाने आक्षेप घेतला आहे. मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावत आपलं मत वैध असल्याचं सांगितलं आहेत.

दरम्यान, न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी अनिल देशमुखांच्या याचिकांवर सुनावणी करण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे सध्या फक्त नवाब मलिकांच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. या निकालावर अनिल देशमुखांचं मतदानाचं भवितव्य अवलंबून होतं. जर मलिकांना परवानगी मिळाली असती तर हा निकाल घेऊन अनिल देशमुख अन्य न्यायमूर्तींपुढे दाद मागणार होते. पण नवाब मलिकांनाच परवानगी नाकारण्यात आल्यामुळे आता अनिल देशमुखांनाही मतदान करता येणार नाही.

शिवसेनेचे आमदार ट्रायडेंट हॉटेलमधून विधानभवनात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लवकरच विधानभवनात दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही विधानभवनात दाखल झाले आहेत.पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजारी असतानाही राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप हे काही महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त असून, त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक आमदाराचे मतदान महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत येण्याची विनंती पक्षातर्फे करण्यात आली होती. त्यावर आपली तब्येत ठीक असल्याचे सांगून लक्ष्मण जगताप हेदेखील आज सकाळी मुंबईत दाखल झाले आहेत.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक सध्या कॅन्सरने आजारी आहे. मात्र, राज्यसभा मतदानास जाण्याचा त्यांनी पण केला आहे. गुरुवारीच त्या मुंबईत दाखल झाल्या. गुरुवारी रात्री त्रास सुरु झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आवश्यक ती काळजी घेऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या राज्यसभेसाठी मतदान करत आहेत.

आज निवडणुकीमध्ये मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला. सर्वात पहिले मतदान भरणे यांनी केले. मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिले मतदान करण्याचा मान मिळणे हा पहिला कौल आमच्या बाजूने लागला आहे. आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदरी निराशा पडली आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना नव्याने अर्ज करण्यास सांगितला असून, त्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मविआच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘आघाडीत बिघाडी’ या भाजपने पसरवलेल्या बातम्या आहेत. मविआत कोणीही नाराज नाही. मविआचे सर्व उमेदवार जिंकून यावेत, यासाठी प्रत्येक जण मदत करत आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

हवेत उडणारे भाजपाचे विमान संध्याकाळी जमिनीवर येणार. भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण पराभूत होणार आहोत, हे त्यांना माहिती असल्याने ते आरोप करत आहेत. असे शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत.