कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाळयापुर्वी नाल्याला अडथळा होणाऱ्यां चार अनाधिकृत बांधकामावर कारवाई करुन सदरची बांधकामे काढून घेण्यात आली आहेत. यामध्ये सम्राटनगर येथील नाल्यामध्ये असलेले अनाधिकृत बांधकाम, गुंजन पॅराडाईज अपार्टमेंटची ओढयामध्ये बांधलेली रिटेनिंग वॉल, मंडलिक वसाहत येथील नाल्यावरील अनाधिकृत पूल व गोखले कॉलेज जवळील नाल्यावर स्लॅब टाकून उभा केलेल्या टपऱ्या, डी मार्ट समोरील बंदीस्त गटरीवरील अनाधिकृत स्लॅबवर  कारवाई करण्यात आली.

मुक्त सैनिक वसाहत येथे चॅनेल सफाईचे काम सुरु होते. या कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी अचानक पाहणी केली. यावेळी प्रशासकांनी स्वत: नागरीकांच्या घरी जाऊन चॅनेलची सफाई कायम होते का नाही याची चौकशी केली. यावेळी नागरीकांनी महापालिकेचे सफाई कर्मचारी दर दोन दिवसाला येऊन चॅनेलची सफाई करतात. परंतु वाहत्या पाण्याबरोबर पुन्हा कचरा व प्लॅस्टिक याठिकाणी वाहत येतो. सफाई कर्मचारी वारंवार येऊन या चॅनेलची सफाई करतात. नागरीकांनी टाकलेला वाहत येणाऱ्या कचऱ्याबाबत काय उपाययोजना करता येईल याबाबत उपशहर अभियंता यांच्याशी चर्चा केली.

यानंतर उपाय योजना म्हणून सदरबाजार येथील यशवंत नगर, मुक्त सैनिक वसाहत, गौरीनंदन पार्क समोरील चॅनेलमध्ये लोखंडी जाळया बसविण्याचे ठरले. त्याप्रमाणे तातडीने याठिकाणी जाळया बसविण्याचे आदेश उपशहर अभियंता यांना दिले.

यावेळी उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैदयकिय अधिकारी डॉ.विजय पाटील आरोग्य निरीक्षक मुनीर फरास उपस्थितित होते.