मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या सहा जागांसाठी उद्या शुक्रवारी (१० जून) सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. दुपारी ४ वाजता हे मतदान संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब मतमोजणीला सुरुवात होईल. शुक्रवारी सायंकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल हाती येईल. यावेळी एकूण २८५ आमदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक या दोन्हीही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

राज्यसभेची महाराष्ट्रातील निवडणूक ही तब्बल २४ वर्षांनी होणार आहे. कारण गेल्या २४ वर्षांपासून राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होत आली आहे; पण यंदा ही निवडणूक मतदानाने पार पडणार आहे. २४ वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी जे मतदान पार पडले होते. ते मतदान सीक्रेट बॅलेट पद्धतीने झाले होत आता होणारे मतदान ओपन बॅलेट पद्धतीने होणार आहे.
प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत हे अत्यंत मोलाचे ठरणार आहे. अशातच सत्र न्यायालयाने ईडीच्या ताब्यात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीच चित्र पुन्हा एकदा बदलल आहे.
महाराष्ट्र विधानसभेत सध्या २८७ आमदारच आहेत. कारण शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले असून, त्यांची जागी रिक्त आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची मतदानाची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. अशावेळी आता राज्यसभा निवडणुकीसाठी फक्त २८५ आमदारच मतदान करणार आहेत.
एखाद्या उमेदवाराला निवडून जायचे असेल तर त्याला ४१ मते आवश्यक आहेत. तर पहिले पाच उमेदवार ज्यांना ४१ चा कोटा मिळालेला आहे त्यांना ४१ मते मिळाल्यानंतर ते निवडून गेले असे घोषित करण्यात येईल, तर त्यापेक्षा त्यांना जी जास्त मते मिळतील, त्यामधील दुसऱ्या क्रमांकाची मते ही तशीच्या तशी ज्या उमेदवाराला त्यांनी दुसऱ्या पसंतीच मत दिले आहे, त्यांच्याकडे ती मते वळतील. अशा पद्धतीने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मतदान होईल. त्यामुळे आता सहाव्या जागेसाठी कोणाला जास्त मते पडतात, हे सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे.