कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागरिकांच्या मागे असणारा हा ‘बी’ सत्ताप्रकारचा ससेमिरा संपवून नोंदीच्या दुरुस्तीत आवश्यक असणाऱ्या कार्यालयांना एकाच छताखाली आणण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने उद्या (शुक्रवार) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जामदार क्लब, शुक्रवार पेठ, कोल्हापूर येथे ‘बी’ ट्युनर नोंदीच्या दुरुस्तीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

कोल्हापूर नगरपालिका व महापालिका अस्तित्वात आल्यानंतर संस्थान काळातील शहर हद्दीतील काही जमिनी, घरे महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली. ही जागा महापालिका प्रशासनाने खरेदीपत्राद्वारे त्या ठिकाणी वास्तव्यास किंवा जागेचा ताबा असणाऱ्या नागरिकांना बाजारमूल्याप्रमाणे विक्री केल्या, परंतु अशा जागांच्या मालमत्ता पत्रकी ‘बी’ सत्ता प्रकारची नोंद कायम राहिल्याने या जागांच्या खरेदीदार नागरिकांना जागांच्या व्यवहारात अनेक अडचणी निर्माण होत आहे.

ही जागा स्वमालकीची असूनही, त्यावर कर्ज मिळत नाही, जागेची विक्री करता येत नाही, वारसाच्या नावे जागा हस्तांतरित होत नाही, अशा अनेक समस्या उद्भवत आहेत. अशा प्रकरणातून नागरिकांना न्याय मिळावा या हेतून शासनाने ‘बी’ सत्ता नोंदीत दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार प्रकरणे दाखल करून घेण्यास सुरवात झाली; परंतु प्रकरण सादर करण्याकरिता शासकीय कार्यालयात नागरिकांची होणारी धावपळ व कागदपत्रांची उपलब्धता यामुळे बरीचशी प्रकरणे आजतागायत ‘जैसे थे’ स्थितीत आहेत.

या शिबिरातून नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचवून नोंदीच्या दुरुस्तीकरिता अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक नगरभूमापन कार्यालयाचा दाखला, इस्टेट विभागाचे नाहरकत दाखला एकाच ठिकाणी प्राप्त होऊन,  प्रांत कार्यालयाकडे जमा करावे लागणारे अर्जही याच ठिकाणी जमा करून घेतले जाणार आहेत. या शिबिराचा लाभ गरजू नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.