कोल्हापूर (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, दुर्गम भागाचा फायदा उठवत कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा देण्यासाठी प्रमाणपत्र नसलेले कंपाऊंडर डॉक्टर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये तयार झाले आहेत. हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळून माया जमविण्याचे काम करीत आहेत.या बोगस डॉक्टरांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

कोणत्याही प्रकारची अॅलोपॅथिक सेवा देण्याचा अधिकार नसतानाही बोगस डॉक्टरांनी एखाद्या रुग्णावर उपचार करणे ही त्या रुग्णाच्या जीवाशी केलेली हेळसांड आहे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांची यादी जाहीर करावी व त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. गाव पातळीवरील या शोध मोहिमेसाठी पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत शिपाई यांची मदत घ्यावी आणि बोगस डॉक्टरांच्या नावांची यादी तयार करावी.

यामुळे गावपातळीवरील बोगस डॉक्टरांची सत्य परिस्थिती समोर येईल आणि त्यांच्यापासून सामान्य जनतेचा बचाव करावा. येत्या पंधरा दिवसात बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त न केल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आरोग्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.