कसबा बावडा (प्रतिनिधी) : कसबा बावडा  येथील डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग  प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.  प्रवेश प्रक्रिया बाबत सर्व माहिती तसेच ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी करण्यात येणार असून  विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.

डॉ. नरके म्हणाले की, डिप्लोमा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्याना डिप्लोमा प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. २ जून पासून ही नोंदणी सुरू केली असून ३० जून ही नोंदणीसाठी अंतिम तारीख निश्चित केली आहे.

त्यामुळे इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे  पॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक हे महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालय मान्यताप्राप्त सुविधा केंद्र म्हणून काम पाहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला असून प्रवेश प्रक्रियेतील तज्ज्ञ प्राध्यापक हे विद्यार्थी आणि पालक यांना वैयक्तिकरीत्या सर्व सखोल माहिती देणार असल्याचेही डॉ. नरके यांनी सांगितले.