कुंभोज (प्रतिनिधी) : कुंभोज येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बायपास रस्त्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. आज (मंगळवार) हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते या बायपास रस्त्याच्या प्राथमिक कामाला सुरुवात करण्यात आली.

अनेक वर्षापासून कुंभोजला बायपास रस्त्याची मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून अनेक वेळा होत होती. ऊस गळीत हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात कुंभोज गावातून रहदारीस अडथळा होत होता. शिवाय एसटी स्टँड ते बाहुबली रोड परिसरात बुधवार व रविवार या दिवशी वाहतूक करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. विद्यार्थ्यांना शाळेला जाताना अनेक वाहनांच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. बऱ्याच वेळा या रस्त्यावर उसाने भरलेली वाहने पलटी होऊन छोटे-मोठे अपघात घडले आहेत.

रस्ता करताना कमी-जास्त प्रमाणात काही शेतकऱ्यांची शेती जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली तक्रार हातकणंगले तहसीलदारांकडे केली. तहसीलदारांनी सर्व शेतकरी व ग्रामपंचायत यांनी एकत्र बसून या प्रश्नावर तोडगा काढावा असा निर्णय दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला काही अटीवर हा रस्ता करण्यासाठी संमती दिली व आज प्रत्यक्ष बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. दोन ते तीन दिवसांत हा रस्ता दुचाकी व चार चाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला होईल, असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले, अशोक आरगे, अजित गोपुडगे, रावसाहेब पाटील, अजित देवमोरे, आप्पासाहेब पाटील, जयश्री जाधव, श्रीकांत पालखे, तलाठी संभाजी घाटगे, डॉ. धर्मवीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आदी उपस्थित होते.