मुंबई (प्रतिनिधी) : आगामी काळात पार पडणाऱ्या पंढरीच्या वारीमध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्बंध लावण्याचा राज्य सरकारचा विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मुंबई, पुणेस ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसून आल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मास्कची सक्ती केली जाणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

टोपे म्हणाले की, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे कठोर आदेश देण्यात आले आहेत. आगामी काळात पंढरीचा पालखी सोहळा निघणार असून, यामध्ये साधारण १० ते १५  लाख नागरिक एकत्र येतात. यामुळे अधिक कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. कोरोना नियमांचे योग्य पालन करूनच हा सोहळा साजरा करण्याचे आता सध्या तरी ठरवण्यात आले आहे.

पंढरीच्या वारीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पंढरीची वारी नक्कीच उत्साहात होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्बंध लावण्याचा विचार राज्य सरकारचा नसेल, असे आपले मत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.