कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीत भाजपने माजी खा. धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने सहावी जागा महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील पडद्यामागे राहून राजकीय खेळी खेळत असल्याची चर्चा होत आहे.

कोल्हापूरचे राजकारण गेल्या काही वर्षांत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्याभोवतीच फिरत आलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, गोकुळ दूधसंघ ते अलीकडेच झालेली विधानसभेची पोटनिवडणूक अशा सर्वच छोट्या मोठ्या निवडणुकांत सतेज पाटलांनी वर्चस्व दाखवून दिले. त्यामुळे धनंजय महाडिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर सतेज पाटील यांची रणनीती काय असेल, अशी चर्चा सुरू झाली. धनंजय महाडिकांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सतेज पाटील या प्रक्रियेत फारसे दिसले नाही. मात्र, सतेज पाटील या निवडणुकीत पडद्यामागे राहून काम करत असल्याचे समोर आले आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात हसन मुश्रीफ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी सतेज पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न त्यांनाच विचारा. हसन मुश्रीफांच्या म्हणण्यानुसार सतेज पाटील यांनी राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजेच धनंजय महाडिकांना विजयापासून रोखण्यापासून सतेज पाटील पडद्यामागून खेळी करत आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांचा पारंपरिक मतदारसंघ महाविकास आघाडीत असल्याने काँग्रेसला दिला होता. त्याचबरोबर पक्षातील अंतर्गत धुसफूस शांत करत काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यात काँग्रेसला मदत केली. आता शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली. पण, या लढतीकडे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक असेच बघितले जात आहे. महाविकास आघाडीतील एकत्रित ताकद या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने ही निवडणूक लादली आहे. ही निवडणूक चांगल्या वातावरणात बिनविरोध करणे अपेक्षित होते. राज्यसभेच्या निवडणुका मतांवर असतात आणि महाविकास आघाडीकडे मते आहेत. अशा परिस्थिती आघाडीने प्रयत्न केला होता. भाजपची मते बाजूला जातील अशी परिस्थिती आहे, असे सतेज पाटील म्हणाले होते.

भाजपच्या सगळ्या आमदारांचा हिशोब केला, तर पूर्वीचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे जवळपास २० हून अधिक आमदार तिथे आहेत. त्यामुळे मला वाटते की, भाजपने त्यांचे आमदार सांभाळले पाहिजेत, असे म्हणत सतेज पाटलांनी भाजपलाच स्पष्ट इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता ना. सतेज पाटील महाडिकांना रोखतात की, महाडिक बाजी मारतात हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.