कोल्हापूर (प्रतिनिधी) :  माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या दाबून ठेवलेल्या भावनांना उद्या ६ जून रोजी किल्ले रायगडवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात वाट करून देणार असल्याचे समजते. संभाजीराजे छत्रपती यांनी मागील महिन्यात स्वराज्य या नावाची संघटना स्थापन केल्याची घोषणा केली होती. सोबतच ही संघटना भविष्यात राजकीय पक्ष देखील होऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले.

यावेळी संभाजीराजे यांनी, राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा देखील केली होती. राजेंच्या या घोषणेनंतर पुढचे काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते. संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभा निवडणुकीनिमित्त कोणी घात केला, याचीही चर्चा रंगली होती. त्यातच संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असताना संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत असताना केलेल्या दाव्यांमुळे अनेक चर्चा व तर्क वितर्कांना ऊत आला होता. मात्र, या सर्व घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे यांनी तूर्तास तरी मौन बाळगणेच पसंत केले होते. ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात दिसले नाहीत अथवा माध्यमांसमोरही व्यक्त झाले नाहीत.

याबाबतच्या आपल्या भावना त्यांनी दाबून ठेवल्या असल्या, तरी ६ जून रोजी किल्ले रायगडवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ते या सगळ्यांवर व्यक्त होणार असल्याचे समजते. छत्रपती संभाजीराजे हे रायगडच्या राजसदरेवरून कधी राजकीय भाष्य करत नाहीत. या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडींबाबत ते नेमके कशा पद्धतीने व्यक्त होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रायगडावरील त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.