मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे येत्या १० जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार होते. पण त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसेना नेते, आमदार अयोध्येला जाणार होते. तेथे राम लल्लाचे दर्शन घेऊन शरयू नदीची आरती करणार होते. आम्हाला अयोध्येत शक्तिप्रदर्शन करायचे नाही, तर प्रभू श्री रामचंद्राचे दर्शन घ्यायचे आहे, असेही राऊत यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आम्ही राजकीय भावनेने नाही तर भक्तिभावाने, श्रद्धा भावाने जाणार आहोत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे तेथे जाता आले नाही. त्यासाठीच १० जूनला हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

आता हा अयोध्या दौऱ्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मनसेचे नेते राज ठाकरे हेदेखील अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत येण्यास त्यांना भाजप खा. बृजभूषण सिंह यांनी मनाई केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना दगाफटका होऊ नये आणि मनसे कार्यकर्ते तेथे अडकून पडू नये म्हणून राज ठाकरे यांनी त्यांचाही दौरा स्थगित केला होता.