कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थायी उपक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी सल्ले, मार्गदर्शनासाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार आहे. शताब्दी हा वैद्यकीय विश्वाचा गौरव सोहळा लोकोत्सव व्हावा अशी केएमएची भूमिका असल्याचे केएमएच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई, समितीचे संयोजक सचिव डॉ. उद्धव पाटील, सदस्य डॉ. अमर आडके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याची सुरुवात दि. ७ जून रोजी होत आहे. शताब्दीपर्यंतची वाटचाल सर्वांना समजावी म्हणून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन या दिवशी शाहू स्मारक भवन येथे केले आहे. त्याचवेळी ‘ अवयवदान ‘ या विषयावर डॉ. अमोल कोडोलीकर प्रबोधनपर व्याख्यान व प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केएमए संस्थेस २०२४ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. संस्थेच्या वतीने ‘बाल आरोग्य केंद्र सुरु केले असून, गरीब व गरजू कुटुंबातील बाल रुग्णांवर नाममात्र शुल्कात उपचार येथे केले जातात. वृद्धांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी तपासणी, सल्ला व मार्गदर्शन केंद्र संस्थेतर्फे चालवले जाते. ‘आर्ट सर्कल’ च्या वतीने ‘केएमए कट्टा’ हा विशेष कार्यक्रम प्रत्येक महिन्याला घेतला जातो.

यावेळी डॉ. रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष डॉ. किरण दोशी, सचिव डॉ. ए. बी.पाटील, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. अश्विनी पाटील, डॉ. रमाकांत दगडे आदी उपस्थित होते.