आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथे शेतातील झाडाच्या फांद्या तोडताना विद्युत प्रवाहित असलेल्या तारेवर फांदी पडून शॉक लागल्याने शंकर धाकू माडभगत (वय ३८) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. आजरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. 

शंकरच्या पाठोपाठ शेतात गेलेले त्यांचे वडील धाकू माडभगत यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. माडभगत यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.