मुंबई (प्रतिनिधी) :  कला शिक्षणातून आपल्या विद्यार्थ्यांना आनंददायी नवी दृष्टी देऊन भारतीय सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे संस्कार करणाऱ्या कलाशिक्षकांनाच शालेय स्तरावरून हद्दपार करण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील सर्व शाळांमधील हजारो कलाशिक्षकांची पदे गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहेत. ही सर्व पदे भरण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने शालेय शिक्षणमंत्र्यांना साकडे घातले आहे.

शालेयस्तरावर कला विषयास महत्त्वाचे स्थान मिळावे, प्रत्येक शाळेमध्ये कला विषय अध्यापनाकरिता एका कलाशिक्षकाची नेमणूक करावी, यासाठी राज्य कलाशिक्षक महासंघ गेल्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर असंख्य निवेदनाद्वारे पाठपुरावाकरून संघर्ष करीत आहे. गेल्या सात वर्षांपासून राज्यातील अनेक शाळांमध्ये सेवानिवृत्तीमुळे हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त भरण्याबाबत शासनाची उदासीन भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे राज्य कलाशिक्षक महासंघने शल्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू शिक्षण सचिवांची मुंबईत भेट घेतली.

नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी शासनाने कलाशिक्षक पदांची भरती न केल्यास कलाशिक्षक महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले, सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र इकारे, सुहास पाटील आदींनी दिला आहे.