नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नुकतीच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी अटक केली. जैन यांच्यानंतर आता केंद्र सरकार दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या तयारीत आहेत. असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, मी काही महिन्यांपूर्वी सर्वांना सांगितले होते की, सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात केंद्र सरकारकडून अडकवले जाणार आहे. त्यापाठोपाठ आता मनीष सिसोदिया यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने सर्व तपास यंत्रणांना काही खोट्या केसेस करण्यास सांगितले आहे.

मनीष सिसोदिया हे देशातील शैक्षणिक क्रांतीचे जनक आणि सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. दिल्लीतील शाळांमध्ये १८ लाख मुले शिकतात. या सर्वांचे भविष्य अंधारात होते. मनीष यांनी त्यांच्या डोळ्यात भविष्याची सोनेरी स्वप्ने दिली. सर्वोत्तम शैक्षणिक कार्य करणारे असे मंत्री भ्रष्ट आहेत का, असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे.