‘युती’मुळे कोल्हापुरात दादांच्या खांद्यावर ‘सेनेची’ प्रचारधुरा..!

कोल्हापूर (प्रमोद मोरे) : मागील चार वर्षांपासून कोल्हापूरचे राजकारण एक वेगळ्याच वळणावरून गेले आहे. राज्यातील दोन नंबरचे मंत्री असणारे चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्ह्यातील सेनेचे आमदार व इतर नेते यांचे अजिबात जमले नाही. जिल्ह्यात वेगवेगळ्या निवडणूक आणि प्रसंगाच्या माध्यमातून दादांनी आणि सेनेच्या आमदारांनी एकमेकाला विरोधी आव्हान देण्यापर्यंत मजल मारली होती. पण राज्यात आता सेना भाजप पुन्हा एकदा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ म्हणत असल्यामुळे एकमेकांना आव्हान देणाऱ्या नेत्यांना एकत्र येऊन ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ म्हणण्याची वेळ येणार आहे. यातच दादांना आव्हान  देणाऱ्या आमदारांची प्रचार धुराच दादांना सांभाळावी लागणार आहे. आता याची सारवासारव लोकांसमोर कशी केली जाते हेच पाहावे लागेल.

गेल्या चार वर्षात भाजप-सेना जरी सत्तेत एकत्र असले तरी एकमेकांचे विरोधकच म्हणून त्यांनी चोख भूमिका पार पडली आहे. यातच कोल्हापूर जिल्ह्यात हीच परंपरा सुरू राहिली. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांतदादा पाटील यांना ‘हिम्मत असेल तर माझ्या विरोधात लढून दाखवा’ असे आव्हान दिले होते. आ. राजेश क्षीरसागर व दादांचे तर एकही दिवस पटले नाही. या दोघांनी एकमेकांवर टोकाचे आरोप केले हे तर सर्वांसमोर आहे. सेना-भाजपचे जिल्ह्यातील ‘सख्य’ प्रत्येकवेळी जनतेसमोर आले आहे. इतकेच काय, प्रत्येक ठिकाणी एकमेकाला अडचणीत आणण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. दादांनी तर आ. प्रकाश आबिटकर यांना डावलून त्यांच्याच मतदारसंघांमध्ये विकासकामांंचे उद्घाटन केले. यावर पुन्हा आबिटकर यांनी दादांवर कडाडून टीका केली होती, कडवट शब्दांत आरोप केले होते.

आमदारांच्या बाबतीत हे होत असतानाच लोकसभेच्या म्हणजेच खासदारकीच्या बाबतीतही काही वेगळे घडले नाही. दादांनी नेहमीच राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना जवळ केले. तर सेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. मात्र युती होणार, याची कुणकुण लागताच दस्तुरखुद्द दादांनीच चर्चेचा सूर बदलला असून विद्यमान खासदारांना एका कार्यक्रमात ‘आता फक्त फुले घ्या, मतांचे नंतर बघू’ असा उपरोधिक टोला मारला आहे.

या सर्व घडामोडीनंतर मात्र दादांची जिल्ह्यातील भूमिका बदलणार असून सेनेच्या याच शिलेदारांची प्रचारधुरा स्टार प्रचारक म्हणून दादांना सांभाळावी लागणार आहे. तर नेहमी दादांना ‘लक्ष्य’ करणाऱ्या सेनेच्या त्याच नेत्यांना तितक्याच प्रेमाने दादांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. आता यांची ही बदलती भूमिका किती चोखपणे बजावली जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे