‘आनंदी-गोपाळ’ रसिकांच्या भेटीला….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते, हे विधान काही आपल्यासाठी नवीन नाही. अशाच एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काही जोडपी अशी असतात, जी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडतात. ‘आनंदी’ आणि ‘गोपाळ’ असंच एक जोडपं. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काल (शुक्रवार) पासून आनंदी आणि गोपाळ यांचा जीवनप्रवास इतिहासाच्या सोनेरी पानांवरुन रुपेरी पडद्यावर उलगडला आहे.

१८८२ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजाला मान्य नव्हते, तेंव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार बोटीने परदेशी जाणारी पहिली स्त्री म्हणजे आनंदी. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. अशा यशस्वी स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला साथ देणारे म्हणजेच गोपाळराव. वयाच्या नवव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झाले. यावेळी मी आनंदीबाईंना मनाप्रमाणे शिकवेन, अशी अट गोपाळरावांनी लग्नाआधी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गोपाळरावांच्या सोबतीने आनंदीबाई या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांचा हाच ध्येयवेडा प्रवास ‘आनंदी गोपाळ’  चित्रपटामध्ये दाखवला आहे.

या चित्रपटाची निर्मिती मंगेश कुलकर्णी, किशोर अरोरा, शारीन मंत्री, अरुणवा जॉय सेनगुप्ता आणि आकाश चावला यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे. या चित्रपटात गोपाळ आणि आनंदी यांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद ही जोडी बघायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, बाल कलाकार अंकिता गोस्वामी आणि अथर्व फडणीस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे