गारगोटी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  आ. नाना पटोले यांनी असंस्कृत भाषा वापरुन बेताल वक्तव्य केले आहे. यासाठी आ. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी आज (बुधवार) भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली. तसेच भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गारगोटी येथील हुतात्मा क्रांती चौकात आ. नाना पाटोलेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करुन दहन करण्यात आले. तसेच भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये आ. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी असे निवेदन दिले.

यावेळी भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई,  भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, सरपंच संदेश भोपळे, संतोष पाटील, राहूल चौगले, रणजित आडके, बाजीराव देसाई, प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे आदी उपस्थित होते.